Saturday, September 29, 2018

लवंग





सर्व भारतीयांच्या स्वयंपाकघरात हक्काचे स्थान पटकावलेल्या 'लवंग' या मसाल्याच्या पदार्थाची छबी असलेले भारत सरकारने छापलेले ५ रुपये किमतीचे हे टपाल तिकीट.

माझ्या माहितीनुसार या तिकीटाचे प्रकाशन वर्ष : २००९

लवंग माहिती नसेल असा भारतीय सापडणे अवघडच! घरातल्या स्वयंपाकघरापासून तर नाक्यावरच्या पानटपरी पर्यंत आढळणारी लवंग मूळची मात्र इंडोनेशिया देशातली. पण जगातल्या मसालाप्रिय अशा सर्व खाद्यसंस्कृतींनी जवळ केलेली अशी ही चीज.

लवंग म्हणजे Syzygium Aromaticum या झाडाच्या कळ्या. मिर्चीसारखा झणझणीत नसला तरी एक प्रकारचा तिखटपणा अंगी बाळगणा-या लवंगेला हा स्वाद eugenol नावाच्या रसायनापासून मिळतो. लवंगेत औषधी गुणधर्म असून आयुर्वेदासारख्या प्राचीन शास्त्रात सुद्धा याचा उल्लेख आढळतो. दाताच्या दुखण्यावर लवंग तेल गुणकारी आहे. 

Wednesday, September 26, 2018

लोकमान्य टिळक




लोकमान्य टिळक (२३ जुलै १८५६ - १ ऑगस्ट १९२०)


माझ्या माहितीनुसार या तिकीटाचे प्रकाशन वर्ष : २०१६

'राष्ट्र  निर्माते' या दैनंदीन वापरासाठी छापलेल्या टपाल तिकीट मालिकेतील १ रुपया किमतीचे  लोकमान्य टिळक  यांची छबी असलेले हे तिकीट.

"स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच" अशी सिंहगर्जना करून जनमानसात स्वातंत्र्याचे स्फुल्लिंग चेतवणारे भारतमातेचे सुपुत्र म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. तत्कालीन इंग्रजांच्या भाषेतच सांगायचे झाले तर टिळक म्हणजे "भारतीय असंतोषाचे जनक" !

काँग्रेस पक्षातील जहाल गटाचे अग्रणी पुढारी म्हणून मान्यता पावलेल्या टिळकांनी आपले अख्खे आयुष्य भारतमातेला पारतंत्र्याच्या जोखडातून मुक्त करण्यात खर्चिले. पुण्यातून प्रकाशित होणाऱ्या केसरी व मराठा या वृत्तपत्रातील संपादकीय लेखातून इंग्रजांच्या राज्यपद्धतीवर कडाडून टीका केली व भारतीयांच्या मनातील असंतोष सतत त्यांच्या कानावर पडत राहील याची दक्षता घेतली. अनेक वेळा तुरुंगवास सोसूनही त्यांनी आपल्या ध्येयावरील निष्ठा ढळू दिली नाही. मंडालेच्या तुरुंगात असताना त्यांनी 'गीतारहस्य' या ग्रंथाची निर्मिती केली. इंग्रजांच्या विरुद्ध करण्यात आलेल्या 'होमरूल चळवळीत' टिळकांचे मोठे योगदान होते.

लोकांमध्ये एकोप्याची भावना वाढीस लागावी म्हणून टिळकांनी पुण्यात सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली. या उत्सवातून राजकीय व सामाजिक प्रबोधन करणे हा त्यामागील प्रमुख विचार होता. पुण्यातील गणेशोत्सव आज इतक्या वर्षांनंतरही जनमानसात आपले वैशिष्ट्यपूर्ण स्थान टिकवून आहे.


टीप : ब्लॉग वाचकांस त्यांच्याकडील एखादे टपाल तिकीट माझ्या संग्रहास द्यावेसे वाटले तर माझ्या ई-मेल (sameercbhide@gmail.com) वर संपर्क साधा, मी आपला ऋणी राहीन.