Sunday, October 21, 2018

दालचिनी



'दालचिनी' या मसाल्याची छबी असलेले भारत सरकारने छापलेले  ५ रुपये किमतीचे हे टपाल तिकीट.

माझ्या माहितीनुसार या तिकीटाचे प्रकाशन वर्ष : २००९


दालचिनी हा मसाल्याचा पदार्थ 'cinnamomum' जातीच्या झाडाच्या खोडाच्या आतील सालीपासून बनवला जातो. या झाडाच्या खोडाला कापून बाहेरील आवरण तासून आतील गर अलगदपणे बाजूला काढतात.  त्याच्या भेंडोळ्या करून त्या वाळवल्या जातात. या भेंडोळ्याच आपण स्वयंपाकात वैशिष्ट्यपूर्ण सुवास आणणारी दालचिनी म्हणून वापरतो.

हा मसाल्याचा पदार्थ भारताच्या शेजारी देशांमध्ये (चीन , श्रीलंका) व मसाल्याच्या पदार्थासाठी सुप्रसिद्ध असलेल्या ईंडोनेशिया मध्ये विशेष करून आढळतो.

Friday, October 19, 2018

काळे मिरे



'काळी मिरी' या मसाल्याची छबी असलेले भारत सरकारने छापलेले  ५ रुपये किमतीचे हे टपाल तिकीट.

माझ्या माहितीनुसार या तिकीटाचे प्रकाशन वर्ष : २००९

मिरे अथवा काळी मिरी हा सहजपणे आढळून येणारा एक मसाल्याचा पदार्थ.

'piper nigrum' नावाच्या वेलीला लागणाऱ्या अत्यंत छोट्या छोट्या फळांना वाळवून मिरे तयार केले जाते. भारतात केरळ राज्यात या मसाल्याचे मूळ स्थान आहे.

व्हिएतनाम हा जगात सर्वात जास्त मिरे पिकवणारा देश म्हणून ओळखला जातो. विशेष म्हणजे एरवी मसाल्याच्या पदार्थांशी फारशी जवळीक न साधणाऱ्या  पाश्चिमात्य खाद्यसंस्कृतीत सुद्धा 'black pepper' नावाने ही मिरपूड आनंदानी मिरवते. 'piperine' नावाच्या रासायनिक घटकामुळे मिऱ्याला त्याची वैशिष्ट्यपूर्ण चव मिळते. काळ्या मिऱ्याचा जागतिक व्यापार हजारो वर्षांपासून चालू असून आजही जगात एक महत्वाचा व्यापारी पदार्थ म्हणून मिऱ्याचे स्थान अबाधित आहे.

Tuesday, October 2, 2018

वेलची




'वेलची' या लज्जतदार मसाल्याची छबी  असलेले भारत सरकारने छापलेले  ५ रुपये किमतीचे हे टपाल तिकीट.

माझ्या माहितीनुसार या तिकीटाचे प्रकाशन वर्ष : २००९

वेलची अथवा वेलदोडा हा जवळपास प्रत्येकाने चाखलेला एक मसालावर्गीय पदार्थ आहे. मग ते खास 'वेलची श्रीखंड' असो अथवा मित्रांसोबतच्या गप्पांची लज्जत वाढवणारा 'इलायची चाय'. आजी किंवा आईने बनवलेला साजूक तुपातला रव्याचा लाड़ू असो अथवा अस्सल बिर्याणी ! वेलदोडा आपले अस्तित्व दाखवल्याशिवाय राहत नाही.

वेलची म्हणजे 'Elettaria cardamomum' नावानी वर्गीकृत केलेल्या वनस्पतीच्या शेंगामधील बी. वेलची हे अस्सल भारतीय मसाला पीक. हा पदार्थ मूळचा भारतातील केरळ राज्यातील. फार पूर्वीपासून म्हणजे अगदी हजारो वर्षांपासून हा मसाल्याचा पदार्थ भारतातून व्यापारी मार्गाने जगात विखुरलेल्या अनेक मानवी संस्कृतींपर्यंत पोहोचत होता व त्यांच्या खाद्याची लज्जत वाढवत होता. अशा या वेलचीचा उपयोग अख्खी न सोललेली शेंग जशीच्या तशी वापरून अथवा सोलून केवळ  आतल्या बियांच्या माध्यमात केला जातो. वेलचीची  'बडी इलायची' नावाची एक जात हिमालयात आढळते.

आजच्या घडीला जगात विकल्या जाणा-या मसाल्याच्या पदार्थांत वेलची तिस-या क्रमांकाचा भाव पटकावते !

Saturday, September 29, 2018

लवंग





सर्व भारतीयांच्या स्वयंपाकघरात हक्काचे स्थान पटकावलेल्या 'लवंग' या मसाल्याच्या पदार्थाची छबी असलेले भारत सरकारने छापलेले ५ रुपये किमतीचे हे टपाल तिकीट.

माझ्या माहितीनुसार या तिकीटाचे प्रकाशन वर्ष : २००९

लवंग माहिती नसेल असा भारतीय सापडणे अवघडच! घरातल्या स्वयंपाकघरापासून तर नाक्यावरच्या पानटपरी पर्यंत आढळणारी लवंग मूळची मात्र इंडोनेशिया देशातली. पण जगातल्या मसालाप्रिय अशा सर्व खाद्यसंस्कृतींनी जवळ केलेली अशी ही चीज.

लवंग म्हणजे Syzygium Aromaticum या झाडाच्या कळ्या. मिर्चीसारखा झणझणीत नसला तरी एक प्रकारचा तिखटपणा अंगी बाळगणा-या लवंगेला हा स्वाद eugenol नावाच्या रसायनापासून मिळतो. लवंगेत औषधी गुणधर्म असून आयुर्वेदासारख्या प्राचीन शास्त्रात सुद्धा याचा उल्लेख आढळतो. दाताच्या दुखण्यावर लवंग तेल गुणकारी आहे. 

Wednesday, September 26, 2018

लोकमान्य टिळक




लोकमान्य टिळक (२३ जुलै १८५६ - १ ऑगस्ट १९२०)


माझ्या माहितीनुसार या तिकीटाचे प्रकाशन वर्ष : २०१६

'राष्ट्र  निर्माते' या दैनंदीन वापरासाठी छापलेल्या टपाल तिकीट मालिकेतील १ रुपया किमतीचे  लोकमान्य टिळक  यांची छबी असलेले हे तिकीट.

"स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच" अशी सिंहगर्जना करून जनमानसात स्वातंत्र्याचे स्फुल्लिंग चेतवणारे भारतमातेचे सुपुत्र म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. तत्कालीन इंग्रजांच्या भाषेतच सांगायचे झाले तर टिळक म्हणजे "भारतीय असंतोषाचे जनक" !

काँग्रेस पक्षातील जहाल गटाचे अग्रणी पुढारी म्हणून मान्यता पावलेल्या टिळकांनी आपले अख्खे आयुष्य भारतमातेला पारतंत्र्याच्या जोखडातून मुक्त करण्यात खर्चिले. पुण्यातून प्रकाशित होणाऱ्या केसरी व मराठा या वृत्तपत्रातील संपादकीय लेखातून इंग्रजांच्या राज्यपद्धतीवर कडाडून टीका केली व भारतीयांच्या मनातील असंतोष सतत त्यांच्या कानावर पडत राहील याची दक्षता घेतली. अनेक वेळा तुरुंगवास सोसूनही त्यांनी आपल्या ध्येयावरील निष्ठा ढळू दिली नाही. मंडालेच्या तुरुंगात असताना त्यांनी 'गीतारहस्य' या ग्रंथाची निर्मिती केली. इंग्रजांच्या विरुद्ध करण्यात आलेल्या 'होमरूल चळवळीत' टिळकांचे मोठे योगदान होते.

लोकांमध्ये एकोप्याची भावना वाढीस लागावी म्हणून टिळकांनी पुण्यात सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली. या उत्सवातून राजकीय व सामाजिक प्रबोधन करणे हा त्यामागील प्रमुख विचार होता. पुण्यातील गणेशोत्सव आज इतक्या वर्षांनंतरही जनमानसात आपले वैशिष्ट्यपूर्ण स्थान टिकवून आहे.


टीप : ब्लॉग वाचकांस त्यांच्याकडील एखादे टपाल तिकीट माझ्या संग्रहास द्यावेसे वाटले तर माझ्या ई-मेल (sameercbhide@gmail.com) वर संपर्क साधा, मी आपला ऋणी राहीन.

Saturday, December 3, 2016

श्रीनिवास रामानुजन

श्रीनिवास रामानुजन (  22 डिसेंबर 1887 - 26 एप्रिल 1920 )
माझ्या माहितीनुसार या तिकीटाचे प्रकाशन वर्ष : २०१६



’राष्ट्राचे शिल्पकार’ या दैनंदीन वापरासाठी छापलेल्या टपाल तिकीट मालिकेतील ४ रुपये किमतीचे  रामानुजन यांची छबी असलेले हे तिकीट.

एक असामान्य प्रतिभा लाभलेला, गणिताचे कुठलेही औपचारिक शिक्षण न घेता गणितात अनेक मोठे शोध लावणारा भारताचा सुपुत्र म्हणजे रामानुजन.आपल्या अवघ्या ३२ वर्षाच्या आयुष्यात "नंबर थिअरी, इनफायनाईट सिरीज" या सारख्या क्लिष्ट गणित प्रकारात त्यांनी लावलेले शोध आंतरराष्ट्रीय गणिती समुदायात नावाजले गेले.

रामानुजन यांनी केम्ब्रिज विद्यापीठात आपले गुरु श्री. हार्डि यांच्या मदतीने अनेक नवीन गणिती शोध लावून त्यांना गणिताच्या परवलीच्या भाषेत बसवून (फॉर्मल प्रूफ) आपल्या असामान्य बुद्धीमत्तेचे दर्शन घडवले. वयाच्या अवघ्या ३२ व्या वर्षी रामानुजन यांनी  जगाचा निरोप घेतला.

Tuesday, July 29, 2014



द्वारकानाथ कोटणीस  (१० औक्टोबर १९१० - ९ डिसेम्बर १९४२)
माझ्या माहितीनुसार या तिकीटाचे प्रकाशन वर्ष : १९९३

१९३७ साली सुरु झालेल्या दुस-या चीन-जापान युद्धात चीनच्या मदतीला भारतातून ५ डॉक्टरांचा चमू पाठवण्यात आला होता व डॉक्टर कोटणीस हे त्या चमू मधील एक.

१९३८ साला पासून त्यांनी अविरतपणे युद्धात आघाडीवार लढणार्‍या जवानांची शुश्रुषा केली व शेवटी अति श्रमाने त्यांच्या प्रकृति वर परीणाम झाला व१९४२ साल संपता संपता त्यांनी या जगाचा निरोप घेतला.

आजही ते भारत-चीन मैत्रीचे एक प्रतीक म्हणून ओळखले जातात व चीन मधील  Shijiazhuang, Hebei, China येथे त्यांचा पूर्णाकृती पुतळा अजूनही त्यांच्या आंतरराष्ट्रीय सहकार भावनेची व पराक्रमाची साक्ष देत उभा आहे.

प्रस्तुत तिकीट त्यांच्या पन्नासाव्या पुण्यासमरणार्थ छापले असावे असा माझा कयास आहे.

टीप : ब्लॉग वाचकांस त्यांच्याकडील एखादे टपाल तिकीट माझ्या संग्रहास द्यावेसे वाटले तर माझ्या ई-मेल (sameercbhide@gmail.com) वर संपर्क साधा, मी आपला ऋणी राहीन.