Friday, August 27, 2010


सुभाषचंद्र बोस ( २३ जानेवारी १८९७ - १८ ऑगस्ट १९४५ )


भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील तळपता सुर्य म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस! नेताजींची छबी असलेले दैनंदिन वापरासाठी भारत सरकारने छापलेले १ रुपया किंमतीचे हे टपाल तिकीट.


माझ्या माहितीनुसार या तिकीटाचे प्रकाशन वर्ष : २००१


भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील अग्रणी व तितकेच स्फुर्तीदायक व्यक्तिमत्व. भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे अध्यक्षपद दोन वेळा भुषविल्यानंतर महात्मा गांधींच्या अहिंसेच्या मार्गानी स्वातंत्र्य मिळवण्याच्या पद्धतीवरुन झालेल्या तात्वीक मतभेदांमुळे सुभाषबाबुंनी कॉंग्रेस पक्षाचा त्याग केला व ’ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक’ नावाचा पक्ष स्थापन केला. संपुर्ण स्वराज्य व त्यासाठी गरज पडल्यास हिंसेचा मार्ग पत्करण्याची तयारी या त्यांच्या क्रांतीकारी धोरणातच त्यांचे द्रष्टेपण दिसुन येते.


दुस-या महायुद्धाच्या वेळी कोंडीत सापडलेल्या इंग्रजांना त्यांच्या शत्रुंची मदत घेउन पुरत नामोहरम कराव व देश स्वतंत्र करावा या विचारांनी प्रेरीत होवुन त्यांनी हिटलर ची भेट घेतली व जर्मनीची या प्रकरणी काही मदत होवु शकते का याची चाचपणी केली. त्यानंतर त्यांनी जपानमधील भारतीय युद्धकैद्यांना इंग्रजांविरुद्ध लढण्यासाठी प्रेरित केले व ’आझाद हिंद सेना’ उभारली. जपानी सैन्याच्या मदतीने त्यांनी अंदमान, निकोबार बेटांना इंग्रजांच्या जोखडातून मुक्त
केले. भारताच्या इशान्य सीमेवरुन मुसंडी मारण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना निसर्गाची साथ लाभली नाही व प्रतिकूल परिस्थीतीमुळे ही मोहीम पुर्णत्वाला जाउ शकली नाही. पण त्यांच्या "चलो दिल्ली" या घोषणेमुळे अवघ्या भारतात चैतन्य पसरले यात शंकाच नाही.

अशा या थोर लढवय्याचा शेवट अत्यंत दुर्दैवी व गूढ अशा विमान अपघातात झाला. परंतु या विषयावर अनेक वेगवेगळे मतप्रवाह आहेत.

माझ्या बाबतीत म्हणाल तर स्वातंत्र्यलक्ष्मीच्या चरणी आपल्या आयुष्याची ओवाळणी घालणा-या नेताजींचे नाव उच्चारताच "तुम मुझे खून दो मै तुम्हे आझादी दुंगा" अशा आवेशपुर्ण गर्जना ऐकु येतात आणि मन म्हणू लागत "कदम कदम बढाए जा .. खुशी के गीत गाए जा .. ये जिंदगी है कौम की तु कौम पे लुटाए जा .."

ऋणनिर्देश

हे तिकीट माझ्या संग्रही ठेवण्यास दिल्याबद्दल आभार !

१. विनायक देशपांडे

टीप : ब्लॉग वाचकांस त्यांच्याकडील एखादे टपाल तिकीट माझ्या संग्रहास द्यावेसे वाटले तर माझ्या ई-मेल (sameercbhide@gmail.com) वर संपर्क साधा, मी आपला ऋणी राहीन.

No comments:

Post a Comment