Sunday, October 21, 2018

दालचिनी



'दालचिनी' या मसाल्याची छबी असलेले भारत सरकारने छापलेले  ५ रुपये किमतीचे हे टपाल तिकीट.

माझ्या माहितीनुसार या तिकीटाचे प्रकाशन वर्ष : २००९


दालचिनी हा मसाल्याचा पदार्थ 'cinnamomum' जातीच्या झाडाच्या खोडाच्या आतील सालीपासून बनवला जातो. या झाडाच्या खोडाला कापून बाहेरील आवरण तासून आतील गर अलगदपणे बाजूला काढतात.  त्याच्या भेंडोळ्या करून त्या वाळवल्या जातात. या भेंडोळ्याच आपण स्वयंपाकात वैशिष्ट्यपूर्ण सुवास आणणारी दालचिनी म्हणून वापरतो.

हा मसाल्याचा पदार्थ भारताच्या शेजारी देशांमध्ये (चीन , श्रीलंका) व मसाल्याच्या पदार्थासाठी सुप्रसिद्ध असलेल्या ईंडोनेशिया मध्ये विशेष करून आढळतो.

Friday, October 19, 2018

काळे मिरे



'काळी मिरी' या मसाल्याची छबी असलेले भारत सरकारने छापलेले  ५ रुपये किमतीचे हे टपाल तिकीट.

माझ्या माहितीनुसार या तिकीटाचे प्रकाशन वर्ष : २००९

मिरे अथवा काळी मिरी हा सहजपणे आढळून येणारा एक मसाल्याचा पदार्थ.

'piper nigrum' नावाच्या वेलीला लागणाऱ्या अत्यंत छोट्या छोट्या फळांना वाळवून मिरे तयार केले जाते. भारतात केरळ राज्यात या मसाल्याचे मूळ स्थान आहे.

व्हिएतनाम हा जगात सर्वात जास्त मिरे पिकवणारा देश म्हणून ओळखला जातो. विशेष म्हणजे एरवी मसाल्याच्या पदार्थांशी फारशी जवळीक न साधणाऱ्या  पाश्चिमात्य खाद्यसंस्कृतीत सुद्धा 'black pepper' नावाने ही मिरपूड आनंदानी मिरवते. 'piperine' नावाच्या रासायनिक घटकामुळे मिऱ्याला त्याची वैशिष्ट्यपूर्ण चव मिळते. काळ्या मिऱ्याचा जागतिक व्यापार हजारो वर्षांपासून चालू असून आजही जगात एक महत्वाचा व्यापारी पदार्थ म्हणून मिऱ्याचे स्थान अबाधित आहे.

Tuesday, October 2, 2018

वेलची




'वेलची' या लज्जतदार मसाल्याची छबी  असलेले भारत सरकारने छापलेले  ५ रुपये किमतीचे हे टपाल तिकीट.

माझ्या माहितीनुसार या तिकीटाचे प्रकाशन वर्ष : २००९

वेलची अथवा वेलदोडा हा जवळपास प्रत्येकाने चाखलेला एक मसालावर्गीय पदार्थ आहे. मग ते खास 'वेलची श्रीखंड' असो अथवा मित्रांसोबतच्या गप्पांची लज्जत वाढवणारा 'इलायची चाय'. आजी किंवा आईने बनवलेला साजूक तुपातला रव्याचा लाड़ू असो अथवा अस्सल बिर्याणी ! वेलदोडा आपले अस्तित्व दाखवल्याशिवाय राहत नाही.

वेलची म्हणजे 'Elettaria cardamomum' नावानी वर्गीकृत केलेल्या वनस्पतीच्या शेंगामधील बी. वेलची हे अस्सल भारतीय मसाला पीक. हा पदार्थ मूळचा भारतातील केरळ राज्यातील. फार पूर्वीपासून म्हणजे अगदी हजारो वर्षांपासून हा मसाल्याचा पदार्थ भारतातून व्यापारी मार्गाने जगात विखुरलेल्या अनेक मानवी संस्कृतींपर्यंत पोहोचत होता व त्यांच्या खाद्याची लज्जत वाढवत होता. अशा या वेलचीचा उपयोग अख्खी न सोललेली शेंग जशीच्या तशी वापरून अथवा सोलून केवळ  आतल्या बियांच्या माध्यमात केला जातो. वेलचीची  'बडी इलायची' नावाची एक जात हिमालयात आढळते.

आजच्या घडीला जगात विकल्या जाणा-या मसाल्याच्या पदार्थांत वेलची तिस-या क्रमांकाचा भाव पटकावते !

Saturday, September 29, 2018

लवंग





सर्व भारतीयांच्या स्वयंपाकघरात हक्काचे स्थान पटकावलेल्या 'लवंग' या मसाल्याच्या पदार्थाची छबी असलेले भारत सरकारने छापलेले ५ रुपये किमतीचे हे टपाल तिकीट.

माझ्या माहितीनुसार या तिकीटाचे प्रकाशन वर्ष : २००९

लवंग माहिती नसेल असा भारतीय सापडणे अवघडच! घरातल्या स्वयंपाकघरापासून तर नाक्यावरच्या पानटपरी पर्यंत आढळणारी लवंग मूळची मात्र इंडोनेशिया देशातली. पण जगातल्या मसालाप्रिय अशा सर्व खाद्यसंस्कृतींनी जवळ केलेली अशी ही चीज.

लवंग म्हणजे Syzygium Aromaticum या झाडाच्या कळ्या. मिर्चीसारखा झणझणीत नसला तरी एक प्रकारचा तिखटपणा अंगी बाळगणा-या लवंगेला हा स्वाद eugenol नावाच्या रसायनापासून मिळतो. लवंगेत औषधी गुणधर्म असून आयुर्वेदासारख्या प्राचीन शास्त्रात सुद्धा याचा उल्लेख आढळतो. दाताच्या दुखण्यावर लवंग तेल गुणकारी आहे. 

Wednesday, September 26, 2018

लोकमान्य टिळक




लोकमान्य टिळक (२३ जुलै १८५६ - १ ऑगस्ट १९२०)


माझ्या माहितीनुसार या तिकीटाचे प्रकाशन वर्ष : २०१६

'राष्ट्र  निर्माते' या दैनंदीन वापरासाठी छापलेल्या टपाल तिकीट मालिकेतील १ रुपया किमतीचे  लोकमान्य टिळक  यांची छबी असलेले हे तिकीट.

"स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच" अशी सिंहगर्जना करून जनमानसात स्वातंत्र्याचे स्फुल्लिंग चेतवणारे भारतमातेचे सुपुत्र म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. तत्कालीन इंग्रजांच्या भाषेतच सांगायचे झाले तर टिळक म्हणजे "भारतीय असंतोषाचे जनक" !

काँग्रेस पक्षातील जहाल गटाचे अग्रणी पुढारी म्हणून मान्यता पावलेल्या टिळकांनी आपले अख्खे आयुष्य भारतमातेला पारतंत्र्याच्या जोखडातून मुक्त करण्यात खर्चिले. पुण्यातून प्रकाशित होणाऱ्या केसरी व मराठा या वृत्तपत्रातील संपादकीय लेखातून इंग्रजांच्या राज्यपद्धतीवर कडाडून टीका केली व भारतीयांच्या मनातील असंतोष सतत त्यांच्या कानावर पडत राहील याची दक्षता घेतली. अनेक वेळा तुरुंगवास सोसूनही त्यांनी आपल्या ध्येयावरील निष्ठा ढळू दिली नाही. मंडालेच्या तुरुंगात असताना त्यांनी 'गीतारहस्य' या ग्रंथाची निर्मिती केली. इंग्रजांच्या विरुद्ध करण्यात आलेल्या 'होमरूल चळवळीत' टिळकांचे मोठे योगदान होते.

लोकांमध्ये एकोप्याची भावना वाढीस लागावी म्हणून टिळकांनी पुण्यात सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली. या उत्सवातून राजकीय व सामाजिक प्रबोधन करणे हा त्यामागील प्रमुख विचार होता. पुण्यातील गणेशोत्सव आज इतक्या वर्षांनंतरही जनमानसात आपले वैशिष्ट्यपूर्ण स्थान टिकवून आहे.


टीप : ब्लॉग वाचकांस त्यांच्याकडील एखादे टपाल तिकीट माझ्या संग्रहास द्यावेसे वाटले तर माझ्या ई-मेल (sameercbhide@gmail.com) वर संपर्क साधा, मी आपला ऋणी राहीन.

Saturday, December 3, 2016

श्रीनिवास रामानुजन

श्रीनिवास रामानुजन (  22 डिसेंबर 1887 - 26 एप्रिल 1920 )
माझ्या माहितीनुसार या तिकीटाचे प्रकाशन वर्ष : २०१६



’राष्ट्राचे शिल्पकार’ या दैनंदीन वापरासाठी छापलेल्या टपाल तिकीट मालिकेतील ४ रुपये किमतीचे  रामानुजन यांची छबी असलेले हे तिकीट.

एक असामान्य प्रतिभा लाभलेला, गणिताचे कुठलेही औपचारिक शिक्षण न घेता गणितात अनेक मोठे शोध लावणारा भारताचा सुपुत्र म्हणजे रामानुजन.आपल्या अवघ्या ३२ वर्षाच्या आयुष्यात "नंबर थिअरी, इनफायनाईट सिरीज" या सारख्या क्लिष्ट गणित प्रकारात त्यांनी लावलेले शोध आंतरराष्ट्रीय गणिती समुदायात नावाजले गेले.

रामानुजन यांनी केम्ब्रिज विद्यापीठात आपले गुरु श्री. हार्डि यांच्या मदतीने अनेक नवीन गणिती शोध लावून त्यांना गणिताच्या परवलीच्या भाषेत बसवून (फॉर्मल प्रूफ) आपल्या असामान्य बुद्धीमत्तेचे दर्शन घडवले. वयाच्या अवघ्या ३२ व्या वर्षी रामानुजन यांनी  जगाचा निरोप घेतला.

Tuesday, July 29, 2014



द्वारकानाथ कोटणीस  (१० औक्टोबर १९१० - ९ डिसेम्बर १९४२)
माझ्या माहितीनुसार या तिकीटाचे प्रकाशन वर्ष : १९९३

१९३७ साली सुरु झालेल्या दुस-या चीन-जापान युद्धात चीनच्या मदतीला भारतातून ५ डॉक्टरांचा चमू पाठवण्यात आला होता व डॉक्टर कोटणीस हे त्या चमू मधील एक.

१९३८ साला पासून त्यांनी अविरतपणे युद्धात आघाडीवार लढणार्‍या जवानांची शुश्रुषा केली व शेवटी अति श्रमाने त्यांच्या प्रकृति वर परीणाम झाला व१९४२ साल संपता संपता त्यांनी या जगाचा निरोप घेतला.

आजही ते भारत-चीन मैत्रीचे एक प्रतीक म्हणून ओळखले जातात व चीन मधील  Shijiazhuang, Hebei, China येथे त्यांचा पूर्णाकृती पुतळा अजूनही त्यांच्या आंतरराष्ट्रीय सहकार भावनेची व पराक्रमाची साक्ष देत उभा आहे.

प्रस्तुत तिकीट त्यांच्या पन्नासाव्या पुण्यासमरणार्थ छापले असावे असा माझा कयास आहे.

टीप : ब्लॉग वाचकांस त्यांच्याकडील एखादे टपाल तिकीट माझ्या संग्रहास द्यावेसे वाटले तर माझ्या ई-मेल (sameercbhide@gmail.com) वर संपर्क साधा, मी आपला ऋणी राहीन.

Saturday, July 26, 2014



जवाहरलाल नेहरू जन्मशताब्दी (१८८९ - १९८९)

स्वतंत्र भारताचे पहिले  पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू  यांची छबी  असलेले भारत सरकारने छापलेले ६० पैसे किमतीचे हे टपाल टिकीट.

माझ्या माहितीनुसार या तिकीटाचे प्रकाशन वर्ष : १९८८

जवाहरलाल नेहरू यांचा जन्म १४ नोव्हेंबेर १८८९ रोजी अलाहाबाद येथे झाला.

भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात त्यांनी मोठे योगदान दिले तसेच स्वतंत्र भारताला जोमाने प्रगती करता यावी यासाठी शिक्षण व औद्योगीक विकासाला चालना दिली.

लहान मुलांच्या लाडक्या चाचा नेहरूंना २७ मे १९६४ रोजी देवाज्ञा झाली व संपूर्ण देश शोकसागरात बुडाला.

प्रस्तुत तिकीट हे त्यांच्या जन्मशताब्दी वर्षात या महान नेत्याची आठवण म्हणून छापण्यात आले आहे.

टीप : ब्लॉग वाचकांस त्यांच्याकडील एखादे टपाल तिकीट माझ्या संग्रहास द्यावेसे वाटले तर माझ्या ई-मेल (sameercbhide@gmail.com) वर संपर्क साधा, मी आपला ऋणी राहीन.

Sunday, December 5, 2010


खुदीराम बोस ( ३ डिसेंबर १८८९ - ११ ऑगस्ट १९०८ )

भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामात हौतात्म्य पत्करणा-या खुदीराम बोस यांची छबी असलेले भारत सरकारने छापलेले १ रुपया किंमतीचे हे टपाल तिकीट.

माझ्या माहितीनुसार या तिकीटाचे प्रकाशन वर्ष : १९९०

पश्चीम बंगाल मधील मिदनापुर जिल्ह्यात जन्मलेले खुदीराम बोस हे भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणा-या क्रांतीकारकांपैकी एक. वयाच्या अवघ्या एकोणीसाव्या वर्षी आपल्या देशासाठी सुळावर चढलेल्या खुदीराम बोस यांनी देशातील अनेक तरुणांना स्वातंत्र्यसंग्रामात उडी घेण्याची प्रेरणा दिली.

प्रस्तुत टपाल तिकीट हे त्यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून प्रकाशीत केले असावे असा माझा कयास आहे.

वंदे मातरम !

डॉ. भीमराव आंबेडकर ( १४ एप्रील १८९१ - ६ डिसेंबर १९५६ )

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांची छबी असलेले भारत सरकारने छापलेले १५ पैसे किंमतीचे हे टपाल तिकीट.

माझ्या माहितीनुसार या तिकीटाचे प्रकाशन वर्षे : १९६६

डॉ. आंबेडकर जनमानसात बाबासाहेब आंबेडकर या नावाने प्रसिद्ध. कुशाग्र बुध्दिमत्तेला मेहनतीची जोड देउन अत्यंत प्रतिकूल परिस्थीतीतुन प्रथम वकिली व नंतर डॉक्टरेट मिळवण्यापर्यंत कामगिरी केलेल्या बाबासाहेबांनी पुढे भारतीय राज्यघटनेच्या पायाभारणीत अतिशय मोलाची कामगिरी बजावली. दलितांच्या उद्धारासाठी त्यांनी केलेले कार्य हा स्वतंत्र भारताच्या सामाजीक जडणघडणीतला एक मानबिंदु आहे.

Monday, October 11, 2010



जमशेदजी टाटा ( ३ मार्च १८३९ - १९ मे १९०४ )

भारतीय उद्योगविश्वाचे पितामह म्हणुन ज्यांचा उल्लेख केला जातो त्या जमशेदजी टाटांची छबी असलेले भारत सरकारने प्रकाशीत केलेले १५ पैसे किंमतीचे हे टपाल तिकीट.

माझ्या माहितीनुसार या तिकीटाचे प्रकाशन वर्ष : १९६५

कापडाच्या गिरणीपासून आपल्या औद्योगीक काराकिर्दीची पायाभरणी करणा-या जमशेदजींनी पोलाद, शिक्षण, जलविद्युत आणि जागतिक दर्जाचे हॉटेल या प्रमुख उद्योगांच्या चतु:सुत्री वर भर दिला. त्यापैकी ’ताजमहाल’ हॉटेल चे उद्घाटन त्यांच्या हयातीत १९०३ साली करण्यात आले. पण त्यांनी बघितलेले भव्य स्वप्न आज ’टाटा स्टील’, ’आय.आय.एस.सी.’, ’टी.आय.एफ.आर.’, ’टाटा पॉवर’ च्या रुपाने प्रत्यक्षात उतरलेले आपण बघु शकतो.

प्रस्तुत टपाल तिकीटावर द्रष्ट्या जमशेदजींच्या छबीच्या पार्श्वभुमीवर त्यांच्या प्रत्यक्षात उतरलेल्या स्वप्नांना विजवाहक तारा व पोलाद उद्योगात लोखंडाचा रस ओतायला वापरली जाणारी सामुग्री यांच्या चित्रांद्वारे प्रातिनिधीक स्वरुपात दाखवण्यात आले आहे.

टीप : ब्लॉग वाचकांस त्यांच्याकडील एखादे टपाल तिकीट माझ्या संग्रहास द्यावेसे वाटले तर माझ्या ई-मेल (sameercbhide@gmail.com) वर संपर्क साधा, मी आपला ऋणी राहीन.

Saturday, October 9, 2010



मेघनाथ साहा ( ६ ऑक्टोबर १८९४ - १६ फेब्रुवारी १९५६ )

भारतीय खगोलशास्त्रन्य मेघनाथ साहा यांची छबी असलेले भारत सरकारने प्रकाशीत केलेले १ रुपया किंमतीचे हे टपाल तिकीट.

माझ्या माहितीनुसार या तिकीटाचे प्रकाशन वर्ष : १९९३

मेघनाथ साहा हे पदार्थविन्यान क्षेत्रातील एक अग्रणी संशोधक. त्यांनी शोधलेले ’साहा समीकरण’ ता-यांच्या अंतरंगातील विविध रासायनिक व भौतीक क्रियांबद्दल माहिती मिळवण्यात उपयुक्त ठरते. त्याचबरोबर त्यांनी अणु तसेच पदार्थविन्यानाच्या शाखेत अनेक विषयांमध्ये मोलाचे योगदान दिले आहे.

याचबरोबर त्यांनी भारताच्या अणु कार्यक्रमाच्या पायाभरणीत मोलाची भुमिका बजावली. बंगालमधील नद्यांच्या पुराच्या समस्येवर तत्कालीन सरकारचे लक्ष वेधून घेण्यातही त्यांनी मोलाची कामगिरी बजावली. एक वैन्यानीक हा कायम समाजापासून व समाजाच्या समस्यांपासून दूर आपल्याच विश्वात वावरतो या सर्वमान्य संकल्पनेला त्यांनी आपल्या वर्तणुकीतुन चुक सिद्ध केले.

त्यांच्या जन्मशताब्दीनिमीत्त ह्या टपाल तिकीटाचे प्रकाशन करण्यात आले असावे असा माझा अंदाज आहे.

टीप : ब्लॉग वाचकांस त्यांच्याकडील एखादे टपाल तिकीट माझ्या संग्रहास द्यावेसे वाटले तर माझ्या ई-मेल (sameercbhide@gmail.com) वर संपर्क साधा, मी आपला ऋणी राहीन.

Friday, October 8, 2010


जवाहरलाल नेहरू ( १४ नोव्हेंबर १८८९ - २७ मे १९६४ )

स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांची छबी असलेली अनेक टपाल तिकीटे छापण्यात आली आहेत. त्यातील हे दैनंदिन वापरासाठी छापलेले २५ पैसे किंमतीचे टपाल तिकीट.

माझ्या माहितीनुसार या तिकीटाचे प्रकाशन वर्ष : १९७६

लहान मुलांचे आवडते व्यक्तिमत्व म्हणजे चाचा नेहरू ! आजही त्यांचा जन्मदिन ’बालदिन’ म्हणून साजरा केला जातो.नेहरूंच्या राजकीय प्रवासाबद्दल माहिती नसलेला माणूस सापडणे विरळच. त्यावर लिहिण्यास घेतले तर ब्लॉग छोटा पडेल! नेहरुंनी लिहिलेल्या ’डिस्कवरी ऑफ इंडिया’ नावच्या पुस्तकावर आधारीत ’भारत - एक खोज’ ही दूरदर्शन वरील मालिका खुप गाजली.



टीप : ब्लॉग वाचकांस त्यांच्याकडील एखादे टपाल तिकीट माझ्या संग्रहास द्यावेसे वाटले तर माझ्या ई-मेल (sameercbhide@gmail.com) वर संपर्क साधा, मी आपला ऋणी राहीन.


Saturday, September 25, 2010


अब्राहम लिंकन ( १२ फेब्रुवारी १८०९ - १५ अप्रील १८६५ )

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांची छबी असलेले भारत सरकारने प्रकाशीत केलेले १५ पैसे किंमतीचे हे टपाल तिकीट.

माझ्या माहितीनुसार या तिकीटाचे प्रकाशन वर्ष : १९६५

अब्राहम लिंकन यांनी १८६१ ते १८६५ अशी ४ वर्षे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षपद भुषविले. त्यांच्या काराकिर्दीत त्यांना अमेरिकन नागरी युद्ध, गुलामगिरीविरुद्धचा लढा अश्या देशांतर्गत व गुंतागुंतीच्या आव्हानांना तोंड द्यावे लागले. अमेरिकेच्या इतिहासातील महान राष्ट्राध्याक्षांमध्ये त्यांची गणना होते यातच त्यांच्या कार्याचा आवाका दिसुन येतो. नागरी युद्धाच्या समाप्तीनंतर ६ दिवसांतच त्यांच्यावर खूनी हल्ला करण्यात आला व त्यातच त्यांचे निधन झाले.

१९६५ साली त्यांच्या शंभराव्या पुण्यतिथीचे औचित्य साधून त्यांना आदरांजली वाहण्यासाठी भारत सरकारने हे तिकीट छापले असावे असा माझा कयास आहे.


टीप : ब्लॉग वाचकांस त्यांच्याकडील एखादे टपाल तिकीट माझ्या संग्रहास द्यावेसे वाटले तर माझ्या ई-मेल ( sameercbhide@gmail.com ) संपर्क साधा, मी आपला ऋणी राहीन.

Tuesday, September 21, 2010


जवाहरलाल नेहरु ( १४ नोव्हेंबर १८८९ - २७ मे १९६४ )

जवाहरलाल नेहरु निधन - दुखवटा - १९६४

स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरु यांची छबी असलेले १५ पैसे किंमतीचे हे टपाल तिकीट.

माझ्या माहितीनुसार या तिकीटाचे प्रकाशन वर्ष : १९६४

पंडीत जवाहरलाल नेहरु यांचे २७ मे १९६४ रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आणि अवघ्या देशावर शोककळा पसरली. त्यांच्या निधनानंतर १२ दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा पाळण्यात आला.

वर दर्शविलेल्या टपाल तिकीटावर जवाहरलाल नेहरु यांच्या छबी व सही बरोबरच पार्श्वभुमीवर मोठा जनसमुदाय आढळतो. हा जनसमुदाय त्यांच्या निधनानंतर शोकाकूल अवस्थेत जमलेल्या नागरिकांचा असावा असा कयास आहे.

टीप : ब्लॉग वाचकांस त्यांच्याकडील एखादे टपाल तिकीट माझ्या संग्रहास द्यावेसे वाटले तर माझ्या ई-मेल वर संपर्क साधा, मी आपला ऋणी राहीन.

Saturday, September 18, 2010


महात्मा गांधी ( २ ऑक्टोबर १८६९ - ३० जानेवारी १९४८ )

भारत - दक्षीण अफ्रीका सहयोग - १९९५

महात्मा गांधींची चिरपरिचीत छबी तर सर्वांच्याच डोळ्यासमोर आहे, परंतु त्यांची तरुणपणीची छबी घेउन भारत सरकारने ’भारत - दक्षीण अफ्रीका सहयोग’ या शिर्षकाखाली छापलेले १ रुपया किंमतीचे हे टपाल तिकीट.

माझ्या माहितीनुसार या तिकीटाचे प्रकाशन वर्ष : १९९५

महात्मा गांधींनी वकिलीचे शिक्षण दक्षीण अफ्रीकेत घेतले. तेथील वर्णद्वेशाविरुद्ध त्यांनी दिलेल्या लढ्यातच त्यांच्या भारतीय राजकारणातील भावी वाटचालीची बीजे रोवली गेली.

भारत आणि दक्षीण अफ्रीका या देशांनी १९९५ साली ’विन्यान आणि तंत्रन्यान’ विषयक सहयोग देण्यासंबंधी करार केला व त्या कराराच्या गौरवार्थ भारत सरकारने २ टपाल तिकीटे छापली, त्यापैकीच हे एक.

टीप : ब्लॉग वाचकांस त्यांच्याकडील एखादे टपाल तिकीट माझ्या संग्रहास द्यावेसे वाटले तर माझ्या ई-मेल (sameercbhide@gmail.com) वर संपर्क साधा, मी आपला ऋणी राहीन.

Friday, August 27, 2010


सुभाषचंद्र बोस ( २३ जानेवारी १८९७ - १८ ऑगस्ट १९४५ )


भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील तळपता सुर्य म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस! नेताजींची छबी असलेले दैनंदिन वापरासाठी भारत सरकारने छापलेले १ रुपया किंमतीचे हे टपाल तिकीट.


माझ्या माहितीनुसार या तिकीटाचे प्रकाशन वर्ष : २००१


भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील अग्रणी व तितकेच स्फुर्तीदायक व्यक्तिमत्व. भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे अध्यक्षपद दोन वेळा भुषविल्यानंतर महात्मा गांधींच्या अहिंसेच्या मार्गानी स्वातंत्र्य मिळवण्याच्या पद्धतीवरुन झालेल्या तात्वीक मतभेदांमुळे सुभाषबाबुंनी कॉंग्रेस पक्षाचा त्याग केला व ’ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक’ नावाचा पक्ष स्थापन केला. संपुर्ण स्वराज्य व त्यासाठी गरज पडल्यास हिंसेचा मार्ग पत्करण्याची तयारी या त्यांच्या क्रांतीकारी धोरणातच त्यांचे द्रष्टेपण दिसुन येते.


दुस-या महायुद्धाच्या वेळी कोंडीत सापडलेल्या इंग्रजांना त्यांच्या शत्रुंची मदत घेउन पुरत नामोहरम कराव व देश स्वतंत्र करावा या विचारांनी प्रेरीत होवुन त्यांनी हिटलर ची भेट घेतली व जर्मनीची या प्रकरणी काही मदत होवु शकते का याची चाचपणी केली. त्यानंतर त्यांनी जपानमधील भारतीय युद्धकैद्यांना इंग्रजांविरुद्ध लढण्यासाठी प्रेरित केले व ’आझाद हिंद सेना’ उभारली. जपानी सैन्याच्या मदतीने त्यांनी अंदमान, निकोबार बेटांना इंग्रजांच्या जोखडातून मुक्त
केले. भारताच्या इशान्य सीमेवरुन मुसंडी मारण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना निसर्गाची साथ लाभली नाही व प्रतिकूल परिस्थीतीमुळे ही मोहीम पुर्णत्वाला जाउ शकली नाही. पण त्यांच्या "चलो दिल्ली" या घोषणेमुळे अवघ्या भारतात चैतन्य पसरले यात शंकाच नाही.

अशा या थोर लढवय्याचा शेवट अत्यंत दुर्दैवी व गूढ अशा विमान अपघातात झाला. परंतु या विषयावर अनेक वेगवेगळे मतप्रवाह आहेत.

माझ्या बाबतीत म्हणाल तर स्वातंत्र्यलक्ष्मीच्या चरणी आपल्या आयुष्याची ओवाळणी घालणा-या नेताजींचे नाव उच्चारताच "तुम मुझे खून दो मै तुम्हे आझादी दुंगा" अशा आवेशपुर्ण गर्जना ऐकु येतात आणि मन म्हणू लागत "कदम कदम बढाए जा .. खुशी के गीत गाए जा .. ये जिंदगी है कौम की तु कौम पे लुटाए जा .."

ऋणनिर्देश

हे तिकीट माझ्या संग्रही ठेवण्यास दिल्याबद्दल आभार !

१. विनायक देशपांडे

टीप : ब्लॉग वाचकांस त्यांच्याकडील एखादे टपाल तिकीट माझ्या संग्रहास द्यावेसे वाटले तर माझ्या ई-मेल (sameercbhide@gmail.com) वर संपर्क साधा, मी आपला ऋणी राहीन.



महादेव देसाई ( १ जानेवारी १८९२ - १५ ऑगस्ट १९४२ )

माझ्या माहितीनुसार या तिकीटाचे प्रकाशन वर्ष : १९८३

महात्मा गांधींचे स्वीय सहाय्यक व भारताच्या स्वातंत्र्यासंग्रामातील एक लढवय्ये महादेव देसाई यांच्या स्मृतीत भारत सरकारने छापलेले ५० पैसे किमतीचे हे टपाल तिकीट.

देसाईंनी स्वातंत्र्यपुर्व काळात महात्मा गांधी संपादक असलेल्या वृत्तपत्रातून लिखाणही केले. त्यांनी अहिंसेच्या सुत्रावर तसेच महात्मा गांधींच्या सहवासातील आठवणींवर लिहिलेली पुस्तके प्रसिद्ध आहेत. १५ ऑगस्ट १९४२ साली वयाच्या ५०व्या यावर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

टीप : ब्लॉग वाचकांस त्यांच्याकडील एखादे टपाल तिकीट माझ्या संग्रहास द्यावेसे वाटले तर माझ्या ई-मेल (sameercbhide@gmail.com) वर संपर्क साधा, मी आपला ऋणी राहीन.
लाल बहादूर शास्त्री (२ ऑक्टोबर १९०४ - ११ जानेवारी १९६६)

माझ्या माहितीनुसार या तिकीटाचे प्रकाशन वर्ष : १९६६

'मुर्ती लहान पण किर्ती महान' अश्या शब्दांत गौरविले जाणारे भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची छबी असलेले १५ पैसे किमतीचे हे टपाल तिकीट.

लाल बहादूर शास्त्री भारताचे पंतप्रधान होण्यापुर्वी भारताच्या रेलवेमंत्री पदावर होते. ते रेलवेमंत्री पदावर असताना १९५६ साली झालेल्या एका रेलवे अपघाताची नैतिक जबाबदारी स्वीकारुन त्यांनी पदाचा राजीनामा देऊ केला होता. राजकारणातील नैतिक अधिष्ठान अधोरेखीत करणारी ही घटना भारतीय आजही विसरु शकलेले नाहीत.

नेहरुंच्या निधनानंतर १९६४ साली शास्त्रीजी भारताचे पंतप्रधान झाले. त्यांच्या पंतप्रधान पदावरच्या लहान काराकिर्दीत त्यांना देशापुढील अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागले. अन्नधान्याची टंचाई तसेच पाकिस्तान बरोबरचे युद्ध ही त्यातील काही ठळक आव्हाने. त्यांनी दिलेला 'जय जवान जय किसान' हा नारा लोकप्रिय ठरला. भारताने युद्ध तर जिंकलेच शिवाय अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपुर्ण होण्याच्या दृष्टीने महत्वाच्या ठरलेल्या हरितक्रांतीच्या दिशेने पहिले पाउलही टाकले.

युद्ध जिंकल्यानंतर रशियातील ताश्कंद येथे युद्धबंदीच्या करारावर स्वाक्षरी केल्याच्या दुस-याच दिवशी त्यांचे निधन झाले व भारत एक सच्च्या राजकारण्याला मुकला. शास्त्रीजींच्या अकाली निधनामागे असलेले रहस्य अजुनही उलगडलेले नाही.

टीप : ब्लॉग वाचकांस त्यांच्याकडील एखादे टपाल तिकीट माझ्या संग्रहास द्यावेसे वाटले तर माझ्या ई-मेल (sameercbhide@gmail.com) वर संपर्क साधा, मी आपला ऋणी राहीन.

जेरोम डीसूजा ( ६ ऑगस्ट १८९७ - १२ ऑगस्ट १९७७ )


जेरोम डीसूजा यांच्या जन्मशताब्दीनिमीत्त भारत सरकारने छापलेले २ रुपये किंमतीचे हे टपाल तिकीट.


माझ्या माहितीनुसार या तिकीटाचे प्रकाशन वर्ष : १९९७

जेरोम डिसुजा हे भारतातील एक विख्यात ख्रिस्ती ’बिशप’. त्याचबरोबर एक विद्वान व लेखक म्हणुनही प्रसिद्ध. भारतीय चर्चवरील ’बिशप’ नेमणूकीत पोर्तुगलला असणा-या अधिकाराबद्दल व्हॅटीकनबरोबरच्या वाटाघाटींमध्ये त्यांचा मोठा वाटा होता. त्याचबरोबर भारतातील फ्रेंच वसाहतिंच्या शांततामय माघारीतही त्यांनी केलेल्या वाटाघाटींचा मोलाचा वाटा होता. युनोच्या वार्षीक सर्वसाधारण सभेत भारताचे प्रतिनिधी म्हणून जेरोम डिसुझांची नियुक्ती करण्यात आली होती.


टीप : ब्लॉगवाचकांस त्यांच्याकडील एखादे टपाल तिकीट माझ्या संग्रहास द्यावेसे वाटले, तर माझ्या ई-मेल (sameercbhide@gmail.com) वर संपर्क साधा, मी आपला ऋणी राहीन.